नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने सुमारे ५६००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करत प्रमुख पाच आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण भूषण स्टील लिमिटेड कंपनीशी संबंधित आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १२ जानेवारी रोजी विशेष ईडी न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी ईडी आरोपींच्या रिमांडची मागणी करणार आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये कंपनीचे माजी उपाध्यक्ष(बँकिंग) पंकज कुमार तिवारी, माजी उपाध्यक्ष(अकाउंट) पंकज कुमार अग्रवाल, माजी मुख्य वित्तीय अधिकारी नितीन जोहरी, माजी प्रवर्तक नीरज सिंगल आणि त्यांचा मेहूणा अजय मित्तलसह त्यांची पत्नी अर्चना मित्तल यांचा समावेश आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, भूषण स्टील लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंगल आणि त्यांच्या सहका-यांनी अनेक शेल कंपन्या स्थापन केल्या आणि बीएसएलशी जोडलेल्या प्रवर्तक आणि संस्थांनी एका कंपनीतून दुस-या कंपनीकडेबँकेचा निधी फिरवला. यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेत सादर करुन एलसीएस (लेटर ऑफ क्रेडिट) मध्ये सूट मिळवण्यासाठी फसवी निवेदने दिली. तसेच, चुकीच्या पद्धतीने निधी त्यांच्या स्वत:च्या कंपन्यांकडे वळवला.
शोध मोहीम राबविली
या प्रकरणी तपास यंत्रणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघल आणि त्यांच्या अनेक सहका-यांविरुद्ध सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणात तपास यंत्रणेने गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर २०२३ मध्ये राजधानी दिल्ली, हरियाणा, कोलकाता, मुंबई, भुवनेश्वर इत्यादी अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली होती.
४ कोटींच्या कारसह ७२ लाख रुपयांची रोकड जप्त
नीरज सिंघल यांना ईडीने गेल्या वर्षी ९ जून २०२३ रोजी अटक केली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपासादरम्यान सापडलेले सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर तपास यंत्रणेने अनेक जंगम आणि जंगम मालमत्ताही जप्त केल्या आहेत. आसाम, रायगड, फरिदाबाद, हरियाणा येथे कंपनीशी संबंधित सुमारे ६१.३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आज त्याचे बाजार मूल्य अनेक पटींनी जास्त मानले जाते.