रायगड : पुण्यावरुन कोकणात जाताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चक्क ५०० फूट खोल दरीत ही थार कार कोसळली. या दुर्घटनेत कारमधील ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमकडून थारमधील इतरांसाठी शोध मोहीम राबविण्यात आली. परवा मंगळवारी रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, २० दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे पर्यटक कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, या तरुणांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये एक थार कार ५०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. थार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या कारमधून एकूण ६ प्रवाशी प्रवास करत होते. परवा मंगळवारी रात्री हा अपघात झाला होता. मात्र, बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांचे लोकेशन रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणा-या ताम्हिणी घाटात सापडल्याने आज या घटनास्थळी शोध सुरू करण्यात आला.
शोधमोहीमेत आतापर्यंत चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. मात्र, उर्वरित २ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून या अपघातातील बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेले सर्व पुरुष असल्याचीही माहिती समोर आली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला. तसेच, अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी. ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह आढळून आले आहेत. ते वर आणण्याचे काम सुरू आहे. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. वाहनात आणखी प्रवासी होते का, याचा तपासही सुरू असल्याची माहिती माणगावचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली. दरम्यान, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

