विरुधूनगर : वृत्तसंस्था
तामिळनाडूमध्ये आज एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात सहा कर्मचा-यांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना तामिळनाडूतील विरुधूनगर जिल्ह्यात घडली. या घटनेची माहिती देताना एका अधिका-याने सांगितले की, रसायनांचं मिश्रण करत असताना हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा जोरदार होता की, त्यात कारखान्याचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला. त्यानंतर आता घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
स्फोटाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रसायनांचं मिश्रण करत असताना हा स्फोट झाला. त्यामुळे कारखान्याचा एक भाग कोसळून गेला. दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनन विभागाच्या पथकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि मदत आणि बचावकार्य सुरू केले. स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बलांना तैनात केले आहे. या स्फोटामुळे फटाके निर्मिती करणा-या कारखान्यांमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्फोटानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.