छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी कारने ६ जणांना उडवले आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
काळा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. एका भरधाव कारने दर्शनासाठी आलेल्या ५-६ जणांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संभाजीनगरातील काळा गणपती मंदिरात सकाळी भाविकांची चांगलीच गर्दी असते. या मंदिराच्या समोर ही घटना घडली. अतिशय भरधाव कारने ६ जणांना चिरडले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
चालकाचे नियंत्रण सुटले
अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसले तरी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या भीषण अपघाताच्या घटनेनंतर कारचालक फरार झाला आहे. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत.
कार गर्दीत घुसली
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा वेग खूप जास्त होता आणि चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट गर्दीत घुसली. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्यावर रक्ताचे थारोळे पडल्याने अत्यंत भयावह दृश्य निर्माण झाले होते.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.