चंद्रपूर : चंद्रपूर येथे महाशिवरात्रीनिमित्त नदीवर अंघोळीसाठी कुटुंबियासोबत गेलेल्या ३ सख्ख्या बहिणींचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज घडली. यापैकी एकीचा मृतदेह सापडला असून दोघींचा शोध सुरू आहे. महाशिवरात्री निमित्त बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या कुटुंबातील आठ जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते. यावेळी नदी पात्राचा अंदाज न आल्याने तिघा सख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या कुटुंबातील एक मुलगा आणि महिला दगडाला धरून राहिल्याने कशाबशा वाचल्याचे म्हटले जात आहे.
दुस-या घटनेत राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे ३ युवक शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. तुषार शालिक आत्राम (१७), मंगेश बंडू चणकापुरे (२०), अनिकेत शंकर कोडापे (१८) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. आता चंद्रपूर येथून बचाव पथक पाठवण्यात आले असून शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली असून नदीत बुडाल्याच्या दोन घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.