कुल्लू : वृत्तसंस्था
देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. गेल्या ३ दिवसांपासून हिमाचल प्रदेशच्या वरच्या भागात बर्फवृष्टी आणि सखल भागात पाऊस पडत आहे. ३ मार्च रोजी पुन्हा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ५ आणि ६ मार्च रोजी राज्यभर हवामान पूर्णपणे स्वच्छ राहील.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रानुसार राज्यात ३ दिवसांच्या हिमवृष्टीमुळे ६५० हून अधिक रस्ते आणि २३०० हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प झाले आहेत. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात १० हून अधिक वाहने वाहून गेली आहेत. चंबा आणि मनालीमध्येही शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे सांगण्यात आले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान गुलमर्गमध्ये ११३ सेमी आणि सोनमर्गमध्ये ७५ सेमी सर्वाधिक बर्फवृष्टी झाली. खराब हवामानामुळे जम्मू-काश्मीर सरकारने शाळांमधील हिवाळी सुटी ६ दिवसांनी वाढवली आहे. १ आणि ३ मार्च रोजी होणा-या इयत्ता १० वी ते १२ वीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. आता या परीक्षा २४ आणि २५ मार्च रोजी होणार आहेत. सततच्या पावसाने हिवाळ््यातील पावसाची ५० टक्के कमतरता भरून काढली आहे.