21.2 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभेत निवडणुकीत ६४.६४ कोटी मतदारांचे मतदान

लोकसभेत निवडणुकीत ६४.६४ कोटी मतदारांचे मतदान

निवडणूक आयोगाने केली आकडेवारी जारी विक्रमाची नोंद

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचे ४२ अहवाल आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम) प्रत्येकी १४ अहवाल जाहीर केले. यावेळी आयोगाने हे अहवाल जगभरातील शिक्षणतज्ज्ञ , संशोधक, निवडणूक निरीक्षकांना उपयुक्त ठरतील असे म्हटले आहे.

पुढे निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, देशात होत असलेल्या निवडणुकांमध्ये लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका आणि चार राज्यांतील निवडणुकांशी संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये ६४.६४ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. इतर देशांच्या तुलनेत भारतातील लोकशाही अभूतपूर्व असल्याचेदेखील आयोगाचे निवडणुकांची आकडेवारी जाहीर करताना म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने या अहवालात लोकसभा जागा, विधानसभेच्या जागा, मतदारांची राज्यनिहाय संख्या, मतदान केंद्रांची संख्या, राज्य आणि लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान, पक्षनिहाय मतदानाचा वाटा, लिंगनिहाय मतदान, महिला मतदारांचा राज्यनिहाय सहभाग, प्रादेशिक भिन्नता, मतदारसंघ डेटा अहवाल, राष्ट्रीय/ राज्य पक्षांची कामगिरी, विजयी उमेदवारांचे विश्लेषण, मतदारसंघनिहाय तपशीलवार निकाल आणि बरेच काही माहिती प्रसिद्ध केली आहे.

मतदारांचा जागतिक विक्रम
आयोगाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ६४.६४ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून जागतिक विक्रम केला. २०२४ मध्ये १२,४५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, तर २०१९ मध्ये ही संख्या ११,६९२ होती. तर २०२४ मध्ये ८३६० उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. तर २०१९ मध्ये ८,०५४ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

महिला मतदारांचे प्रमाण अधिक
निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग सातत्याने वाढत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या अहवालानुसार लोकसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांनी जास्त सहभाग घेतला. हे अतिशय उत्साहवर्धक परिणाम आहेत. लोकसभा निवडणुकीत ६५.७८ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे आयोगाने म्हटले आहे. तर ६५.५५ टक्के पुरुष मतदारांनी यात सहभाग घेतला. तर २०२४ मध्ये निवडणूक लढविणा-या महिला उमेदवारांची संख्या ८०० होती. तर २०१९ मध्ये ही संख्या ७२६ होती, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

२०२४ मध्ये तृतीयपंथी मतदारांचा टक्का वाढला
आयोगाने पुढे म्हटले आहे की, २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांची संख्या ४६.४ टक्के वाढली आहे. २०२४ मध्ये ९०,२८,६९६ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली होती. तर २०१९ मध्ये ही संख्या ६१,६७,४८२ होती. आयोगाने असेही म्हटले आहे की, २०१९ मध्ये ५४० मतदान केंद्रांवर पुनर्मतदान झाले. तर २०२४ मध्ये हे फक्त ४० मतदान केंद्रांवर झाले. एकूण १०.५२ लाख मतदान केंद्रांच्या तुलनेत ०.००३८ टक्के आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR