मुंबई : राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले होते. मात्र, दिलेल्या मुदतीपर्यंत राज्यातील २ कोटी ४७ लाख महिलांपैकी १ कोटी ८० लाख महिलांनी ई-केवायसी केली तर तब्बल ६७ लाख महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे अखेर त्या आता लाडकी बहिणीच्या लाभापासून कायमच्या वंचित राहणार आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२४ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. सुरुवातीला तब्बल २ कोटी ६२ लाख अर्ज दाखल झाले होते. मात्र, छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या. गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील सुमारे २ कोटी महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यसरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महीना १५०० रुपये जमा होता. मात्र ऑक्टोबरमध्ये पैसे मिळाल्यानंतर नोव्हेंबर सरला, डिसेंबर संपला तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्याचे एकत्र १५०० रुपये मिळतील अशाही बातम्या समोर येत होत्या, मात्र हे पैसे खात्यात कधी जमा होणार याची काही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.
दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले होते. त्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच होती. खरंतर नोव्हेंबरपर्यंतच ई-केवायसीची मुदत होती, मात्र लाखो महिलांचे ई-केवायसी न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले होते. आधी ईकेवायसीची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंत होती, मग ती वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पण त्यानंतरही अनेक महिलांना ई-केवायसी करण्याच अडचणी आल्याने ही मुदत वर्षाअखेरीस, ३१ डिसेंबपर्यंत वाढवण्यात आली. काल अखेर ही मुदत संपली. त्यामुळे आता ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यानंच या योजनेचा लाभ आणि पर्यायाने दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. उर्वरित महिलांना या योजनेला मुकावे लागणार आहे.
ग्रामीण भागात अडचणी
महिला व बालविकास विभागातील अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात एकूण २ कोटी ४७ लाख महिला पात्र होत्या. त्यापैकी केवळ १ कोटी ८० लाख महिलांनीच विहित मुदतीत ई-केवायसी केली आहे. उर्वरित ६७ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्या आता या लाभापासून मुकणार आहेत. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार काही प्रमाणात कमी होईल.
नोव्हेंबरचा लाभ जमा
निवडणूक आणि तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते. त्यापैकी नोव्हेंबरचा हप्ता १ जानेवारीपासून बहुतांश महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात आता १५०० रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ५ लाखांहून अधिक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही.

