बीड : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाचा सर्वेक्षण केला जात आहे. यासाठी 23 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून, 31 जानेवारीला हे सर्वेक्षण संपणार आहे. मागील सहा दिवसांत मराठवाड्यात सर्वेक्षणाचे काम मोठ्या वेगाने सुरु आहे. दरम्यान, अशीच काही परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 68 टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहेत.
मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला वेग आला असून, उद्या या सर्वेक्षणाची अंतिम तारीख आहे. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 68 टक्के मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 23 जानेवारीपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. बीड जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण करता आलं नव्हतं. मात्र, आता या सर्वेक्षणाला वेग आला असून, सर्वेक्षण करणारे कर्मचारी दारोदारी जाऊन खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करत आहेत. या सर्वेक्षणासाठी 182 प्रश्नाची प्रश्नावली असून, काही प्रश्न किचकट असल्याचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सर्वेक्षणाच्या कामाला वेग
सर्वेक्षणाची उद्या शेवटची तारीख असून, मराठा आणि खुल्या प्रवर्गातून देखील मोठ्या प्रमाणात या सर्वेक्षणाला प्रतिसाद मिळत आहे. मागासवर्गीय आयोगाकडून हे सर्वेक्षण केले जात असून, मराठा आणि खुल्या प्रवर्गातील प्रत्येक नागरिकाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहे. उद्या या सर्वेक्षणाची शेवटची तारीख असल्याने अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामाला वेग दिला आहे.