नवी दिल्ली : नऊ केंद्रीय मंत्र्यांसह राज्यसभेच्या ६८ सदस्यांचा कार्यकाळ यंदा पूर्ण होत आहे. नऊ केंद्रीय मंत्र्यांसह राज्यसभेचे ६८ खासदार निवृत्त होणार आहेत. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. या ६८ रिक्त पदांपैकी दिल्लीतील तीन जागांसाठी निवडणूक आधीच जाहीर झाली आहे. आम आदमी पार्टीचे (आप) संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांचा कार्यकाळ २७ जानेवारीला संपत आहे. सिक्कीममधील एकमेव राज्यसभेच्या जागेसाठीही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येथे सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ) सदस्य हिशे लाचुंगपा २३ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह ५७ नेत्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १० जागा रिक्त होत आहेत. यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी सहा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच, कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी चार, ओडिशा, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन, झारखंड, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे.