काठमांडू/पाटणा : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आज सकाळी ६ वाजून ३५ मिनिटाला शक्तिशाली असा ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाच्या धक्क्याने माऊंट एव्हरेस्टजवळील दुर्गम हिमालयीन प्रदेशाला मोठे हादरे बसले आहेत. या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआर आणि बिहारच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार भूकंपामुळे जिजांग शहरात ५३ जणांचा मृत्यू झाला असून, ३८ जण जखमी झाले आहेत.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील लोबुचेपासून ९३ किलोमीटर चीनमधील तिबेटच्या पर्वतीय सीमेवर आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे काठमांडू आणि तेथून २०० किलोमीटरहून अधिक इमारती हादरल्या आहेत. भूकंप सुमारे १० किलोमीटर खोलीवर बसल्याचे या संस्थेने म्हटले आहे. भूकंपाच्या हालचालींमुळे नेपाळसह सीमेजवळील राज्यांमध्ये चिंता वाढली आहे. नेपाळ आणि भारताच्या प्रभावित भागांतील अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
बिहारमध्ये भूकंपाचे धक्के- बिहारमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडले. अचानक सकाळी झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहारची राजधानी पाटणाशिवाय पूर्णिया, मधुबनी, शिवहार, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, मोतिहारी आणि सिवानसह या जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला.
बिहारच्या एकूण जिल्ह्यापैकी निम्म्या जिल्ह्यात सकाळी ६.३५ ते ६.३७ च्या दरम्यान लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. पूर्णिया येथील रहिवासी महिलेने सांगितले, सकाळी उठल्यानंतर पतीला चहा दिला. ते चहा पीत असताना अचानक त्यांच्या हातातील चहाचे कप हलू लागले. घरातील पंखेही भूकंपाच्या धक्क्यामुळे फिरत होते. जमीन थरथरत असल्याचा भास झाल्यानंतर भूकंप झाल्याचे लक्षात आले.