नवी दिल्ली : उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ७.६ टक्के नोंदवला गेला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत विकास दर ६.२ टक्के होता. गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दुसऱ्या तिमाहीतील सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा डेटा जागतिक पातळीवर अशा कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि ताकद दर्शवितो.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार, कृषी क्षेत्रातील सकल मूल्यवर्धित (जीव्हीए) वाढीचा दर १.२ टक्के आहे जो २०२२-२३ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत २.५ टक्के होता. उत्पादन क्षेत्रातील जीव्हीए वाढीचा दर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १३.९ टक्के आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ३.८ टक्क्यांनी घसरला होता. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत जीडीपी वाढीचा दर ७.७ टक्के आहे, जो मागील वर्षी याच सहामाहीत ९.५ टक्के होती.
२०२३-२४ सालातील जुलै-सप्टेंबर दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वृद्धीदर भारतीय अर्थव्यवस्थेतील लवचिकता आणि मजबूतपणा दाखवतो. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता हे सकारात्मक चित्र आहे. नवी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी आम्ही देश वेगाने प्रगती करेल हे पाहत राहू, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.