मुंबई : प्रतिनिधी
चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीत रविवारी पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये २ चिमुकल्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील दोघे वगळता सर्व जण होरपळून मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या के. एन. गायकवाड मार्गावरील गांगुर्डे प्लॉट नंबर १६ येथील छेदिराम अलगुराम गुप्ता (७०) यांच्या राहत्या घराला आग लागली. गुप्ता यांचे राहते घर १+२ पोटमाळ््याचे असून घराच्या तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते. या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली. पहाटे साडेचारच्या सुमारास ही आग लागली होती. झोपेत असल्याने अनेकांना काय घडले हे समजलेच नाही. त्यामुळे कुटुंबातील २ सदस्य वगळता ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य छेदिराम गुप्ता व त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता भडकलेल्या आगीतून कसेबसे घराबाहेर पडले. यात ते दोघेही जखमी झाले. परंतु कुटुंबातील गीतादेवी छेदिराम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, विधी धर्मदेव गुप्ता, नरेंद्र धर्मदेव गुप्ता, प्रेम छेदिराम गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता हे घरातच अडकल्याने होरपळून मृत्युमुखी पडले. दरम्यान, गुप्ता कुटुंबीयांना सरकारच्या वतीने मदत करण्याची घोषणा केली.
रॉकेलमुळे आग भडकली
शॉर्ट सर्किटमुळे रविवारी पहाटेच्या सुमारास घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती असली तरी दुकानात लागलेली आग रॉकेलच्या बॅरेलमुळे जास्त भडकली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. घरात खाली दिवा पेटलेला होता, त्यातून ही आग वरपर्यंत भडकली. यात गुप्ता कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.