लातूर : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजनेचा लाभ घेत काल पर्यंत लातूर परिमंडळातील ७ हजार ९८७ वीजग्राहकांनी लाभ घेतला आहे. या योजने अंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे ३१ मार्च अखेर पर्यंत देण्यात आलेल्या वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. सदर योजनेस ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणा-या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
लातूर, धाराशिव व बीड जिल्हयांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळातील ७ हजार ९८७ कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या वीजग्राहकांनी १३ कोटी ५ लाख रूपयांचा भरणा करत अभय योजनेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांना तब्बल ८ कोटी २६ लाख रूपयांची भरघोस सुट मिळालेली आहे. यामध्ये लातूर जिल्हयातील लातूर विभागाच्या ८४८ ग्राहकांनी ८२ लाख रूपयांचा भरणा करत २९ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर निलंगा विभागातील १ हजार ८३२ ग्राहकांनी १ कोटी २६ लाख रूपयांचा भरणा करत ४५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे.
तसेच उदगीर विभागातील १ हजार ३४५ ग्राहकांनी १ कोटी ७ लाख रूपयांचा भरणा करत ४२ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. धाराशिव जिल्हयातील १ हजार ५८५ वीजग्राहकांनी १ कोटी ३९ लाख रूपयांचा भरणा करत ६९ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. यामध्ये तूळजापुर विभागातील ६७४ वीजग्राहकांनी ५९ लाख रूपयांचा भरणा करत ३० लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर धाराशिव विभागातील ९११ वीजग्राहकांनी ८१ लाख रूपयांचा भरणा करत ३९ लाख रूपयांची सुट मिळवली आहे.
बीड जिल्हयातील २ हजार ३७७ वीजग्राहकांनी ८ कोटी ५१ लाख रूपयांचा भरणा करत ६ कोटी ४० लाख रूपयांची भरघोस सुट प्राप्त केली आहे. यामध्ये आंबाजोगाई विभागातील ६८५ वीजग्राहकांनी ६ कोटी २४ लाख रूपयांचा भरणा करत ४ कोटी ६६ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर बीड विभागातील १ हजार ६९२ वीजग्राहकांनी २ कोटी २८ लाख रूपयांचा भरणा करत १ कोटी ७४ लाख रूपयांची सुट मिळवली आहे.
अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.