रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनातर्फे ‘नमो तीर्थस्थळ सुधार’ अभियान राबवण्यात येत आहे. अभियानांतर्गत राज्यभरातील ७३ ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील पांडवकालीन कर्णेश्वर मंदिराचा समावेश केला आहे. त्यामुळे या तीर्थस्थळांचा ऑगस्ट २०२४ पर्यंत कायापालट होणार आहे.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत मंदिरांचा जीर्णोद्धार, भाविकांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे, परिसराचे सुशोभीकरण, डिजिटल दर्शन आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शासनाने निश्चित केलेल्या ७३ ऐतिहासिक स्थळांमध्ये मंदिरे, बारव, ऐतिहासिक इमारती, तलाव यांचा समावेश आहे. त्यांचा इतिहास सांगणारे फलक क्यूआर कोडसह दर्शनी भागात लावले जाणार आहेत.
मंदिरांच्या देखभालीसाठी पाच भक्तांची समिती नियुक्त केली जाणार आहे. ३१ ऑगस्ट २०२४ अखेर ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये कसबा येथील कर्णेश्वर मंदिर यांचाही जीर्णोद्धार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजना, स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव, विभागीय निधी आणि नियमित निधी या माध्यमातून यासाठी खर्च केला जाईल.
कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. देवीने दिलेल्या आदेशानुसार, एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. त्यामुळे या भागाला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे.
संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर ‘कर्णेश्वर’ नावाने ओळखले जाते. वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते.