जोहान्सबर्ग : संपत्ती, प्रेम, वादविवाद किंवा अन्य कोणतीही कारणे असोत. जगात दररोज खुनाच्या घटना समोर येत असतात. गुन्हा करणारा आरोपी आपला गुन्हा लपविण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवतो. जोहान्सबर्ग येथे एका गुन्हेगाराने एक खून लपविण्यासाठी आणखी ७६ जणांचा बळी घेतला. ही खळबळजनक घटना दक्षिण आफ्रिकेत घडली आहे. पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका पाच मजली इमारतीला आग लागली. त्या आगीत ७६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने या घटनेची चौकशी सुरु झाली. त्यानुसार ते तपास करत होते. मात्र, पोलिसांना या घटनेचे काही धागेदोरे सापडत नव्हते.
एक वर्ष झाले पोलीस तपास सुरु होता. अचानक खब-यामार्फत माहिती मिळाली आणि पोलिसांनी गुन्हेगाराला बेड्या घातल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्गमध्ये गेल्या वर्षी पाच मजली इमारतीला आग लागली होती. ज्या दिवशी आग लागली त्याच दिवशी आरोपीने एका व्यक्तीचा संपत्तीच्या वादातुन गळा दाबून खून केला होता. आपल्या हातातून घडलेल्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने खून केलेल्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि माचिसच्या काडीने पेटवून दिले. मृतदेह पूर्ण जळाला नव्हता. त्याचवेळी खोलीत असलेल्या पेट्रोलने पेट घेतला आणि पहाता पहाता पूर्ण इमारतच आगीच्या विळख्यात आली.
रात्रीचे वेळ असल्याने इमारतीमधील लोकांना काही समजले नाही. काही जण झोपेत होते. इमारतीला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी अनेक जण इमारतीमध्येच अडकून पडले होते. त्यामुळे तब्बल 76 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.