नवी दिल्ली : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने संसदेमध्ये ५०% प्रतिनिधित्वाचा ऐतिहासिक निर्णय झाला असला तरी, इंटर पार्लियमेंटरी युनियनच्या अहवालातून महिला खासदार आणि कर्मचा-यांवरील छळाचे धक्कादायक वास्तव समोर आले असून देशात ७६ टक्के महिला खासदार मानसिक छळाच्या शिकार होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
सध्या भारतामध्ये ११६ महिला खासदार असून त्यापैकी लोकसभेत ७५ खासदार आहेत. अहवालानुसार विविध देशांमधील संसदेतील महिला सदस्यांमध्ये मानसिक छळ सहन करणा-या सदस्यांचा आकडा सर्वाधिक ७६ टक्के एवढा आहे. तर ६३ टक्के महिला कर्मचा-यांच मानसिक छळ होतो. लैंगिक छळाचा आकडाही मोठाही आहे. तब्बल २५ टक्के महिला खासदारांना लैंगिक हिंसेला सामोरे जावे लागत आहे. भारतासह ३३ देशांतील २५% महिला खासदार लैंगिक हिंसा, ७६% मानसिक छळ, २४% आर्थिक हिंसा आणि १३% शारीरिक छळ सहन करत आहेत; महिला कर्मचा-यांमध्येही हे प्रमाण मोठे आहे. ऑनलाईन माध्यमातून ६०% महिला खासदारांना ट्रोलिंग, बदनामी, खोट्या बातम्या व कौटुंबिक माहिती व्हायरल करण्याच्या धमक्या मिळतात; अविवाहित, अल्पसंख्याक आणि ४० वर्षांखालील महिला सर्वाधिक प्रभावित आहेत.
१३ टक्के खासदार शारीरिक हिसेंचा सामना
लैंगिक हिसेंप्रमाणे आर्थिकदृष्टयाही महिला खासदारांना हिंसेला सामोरे जावे लागत आहे. हा आकडाही २४ टक्के एवढा आहे. विविध देशांमधील १३ टक्के महिला खासदार शारीरिक हिसेंचा सामना करत आहेत. संसदेतील महिला कर्मचा-यांमध्ये हे प्रमाण ५ टक्के एवढे आहे.
ऑनलाईनही छळ
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हणजे ऑनलाईन पध्दतीने महिला खासदारांचा छळ केला जात असल्याचे वास्तव आहे. ऑनलाईन माध्यमातून त्यांची बदनामी करणे, चुकीची माहिती व्हायरल करून प्रतिमा मलीन करणे, कौटुंबिक माहिती सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी महिला खासदारांना दिली जाते. हा आकडा तब्बल ६० टक्के एवढा आहे.
४० वर्षाआतील खासदारांना अधिक त्रास
युनियनने कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन आणि आशियान इंटर पार्लिमेंटरी असेंब्लीच्या सहकार्याने हा सर्व्हे केला आहे. त्यासाठी भारतासह विविध देशांमधील १५० महिला खासदारांशी संवाद साधण्यात आला होता. प्रामुख्याने अविवाहित, अल्पसंख्याक आणि ४० वर्षांपेक्षा वय कमी असलेल्या महिला खासदारांना हा त्रास सर्वाधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.