महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे निर्णय घेणार?
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरून भांडणा-या महाविकास आघाडीचे निकालात अक्षरश: पानीपत झाले. विधानसभेला मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५० देखील जागा मिळाल्या नाहीत. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. त्यात बहुतांश जणांनी स्वबळाचा सूर आळवला. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आगामी निवडणुका पक्षाने महाविकास आघाडीतून न लढता स्वबळावर लढवाव्यात, असा सूर शिवसेना ठाकरे गटात उमटला. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत बहुतांश पराभूत उमेदवारांनी, नेत्यांनी एकला चलो रेचा सूर आळवला. ठाकरेंकडे अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केल्याची कबुली शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेतील उपनेते अंबादास दानवे यांनी दिली. पक्षात अनेकांचा स्वबळाचा सूर आहे आणि आम्ही ते अजिबात नाकारत नाही. शिवसेनेने स्वतंत्रपणे लढले पाहिजे, असे ब-याच जणांना वाटते. शिवसेना काही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. सत्ता शिवसेनेला कधी ना कधी मिळेलच. शिवसेना एका विचाराने काम करणारी संघटना आहे. ब-याच जणांनी तो विचार मांडला. शिवसेनेने सगळ््या निवडणुकांमध्ये आपले स्वतंत्र संघटन उभे करून निवडणूक लढली पाहिजे, असे दानवेंनी सांगितले.
आम्ही घाईघाईत भूमिका
मांडणार नाही : वडेट्टीवार
शिवसेना ठाकरे गटात स्वबळाचा सूर लावला जात असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जशी त्यांची स्वबळाची इच्छा आहे, तशी आमचीही इच्छा होती. हा इच्छेचा विषय नाही. आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि निकालानंतर त्यांनी काय करायचे तो त्यांचा निर्णय आहे. आमची भूमिका आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्हीही मांडू. पण आम्ही काही इतक्या घाईने भूमिका मांडणार नाही. हायकमांडशी चर्चा करू. त्यानंतर भूमिका घेतली जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.