तापमानाचा पारा घटल्याने शहर गारठले
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर वाढला असून २९ नोव्हेंबर दिवशी पहाटे तापमान १३ ते १४ डिग्री सेल्सिअस खाली गेल्याने वातावरण चांगलेच गारठले असून याचा परिणाम वयोवृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी गारठा अधिक जाणवत असून ग्रामीण भागासह शहरातील नागरीक उबदार पकड्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.
लातूर शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसाही गार वारे वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे किमान तापमानात घट होत असल्याचे दिसमन येत आहे. वातावरणात गारठा निर्माण झाल्याने लहान मुलांना विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थंडीत लहान मुलांना आरोग्याचा धोका निर्माण झाला असून त्यासाठी लहान लेकरांना जपण्याचा वैद्यकीय सल्ला डॉक्टर देत आहेत. थंडीच्या दिवसात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे, उलटी, जुलाब, पोटदुखी, अंगदुखी हे आजार प्रामुख्याने होतात.
वेळीच काळजी व बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास लहान मुलांना झालेला आजार लवकर बरा होतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं विविध आजारांचा लहान मुलांना सामना करावा लागतो. या वाढलेल्या थंडीमुळे वयोवृद्ध माणसे व लहान मुले चांगले परेशान झाले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध माणसानी सकाळी लवकर थंडीत बाहेर न जाता घरीच थांबावे. सकाळी ऊन पडल्यानंतर काही वेळ उन्हात बसावे. स्नग्धिजन्य पदार्थांचे सेवन करावे. श्वसनाचा प्राणायाम करावा. प्रत्येक नागरिकांनी सकाळी थोडा बहुत व्यायाम व प्राणायाम करावा, असा डॉक्टर सल्ला देत आहेत.