29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeपरभणीकृषि विद्यापीठाला रस्ते कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

कृषि विद्यापीठाला रस्ते कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

परभणी : परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रस्ते दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यासाठी परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी पाठपुरावा केला होता. विद्यापीठातील रस्त्यांना जवळपास गेल्या १२ वर्षांपासून निधी न मिळाल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली होती. आता ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे विद्यापीठातील रस्ते दुरूस्ती तसेच नवीन रस्ते निर्मिती होणार आहे.

परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ५० कोटी रुपयांचा निधी देऊन विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यात याव्यात, तंत्रज्ञानावर संशोधनासाठी भरीव निधी द्यावा, कृषी विषय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या गत वर्षीच्या अधिवेशन दरम्यान केली होती. त्यानंतर काही दिवसानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच कृषी शिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत.

आता राज्याच्या कृषी विभागाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी ८ कोटीचा निधी जाहीर केला आहे. विद्यापीठात २००७ ते २००९ दरम्यान रस्त्याची कामे केली होती. परंतु त्यानंतर निधी न मिळाल्याने रस्त्याची कामे झाली नव्हती. त्यामुळे विद्यापीठातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध विकास कामांसाठी ५० कोटी रूपये निधी देण्याची मागणी आ. डॉ. पाटील यांनी अधिवेशनात केली होती. त्यानुसार राज्य शासनाने रस्त्यांच्या कामासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या संदर्भात कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांनी आदेश जारी केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR