नवी दिल्ली : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात आग विझविण्यासाठी गेलेल्या आठ वनकर्मचा-यांना आग लागली. आगीत होरपळलेल्या आठ कर्मचा-यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला. तर चार जणांवर उपचार सुरू आहेत. येथील सिव्हिल सोयम वनविभागाच्या बिनसार वन्यजीव अभयारण्यात आग लागल्यामुळे हे कर्मचारी आग विझविण्यासाठी गेले होते. मात्र तेच आगीच्या कचाट्यात सापडले.
सिव्हिल सोयमचे वनविभागीय अधिकारी ध्रुव सिंग मारटोलिया यांनी सांगितले की, हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास घडला, वन्यजीव अभयारण्यात आग लागल्याची माहिती मिळताच आठ वन कर्मचा-यांचे पथक आग विझविण्यासाठी घटनास्थळी गेले होते. त्यांनी सांगितले की, पथक वाहनातून खाली उतरताच जोरदार वा-यासह वाढलेल्या आगीने त्यांनाही वेढले, त्यामुळे चार वनकर्मचा-यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत बिनसार रेंज फॉरेस्ट बीट अधिकारी त्रिलोक सिंग मेहता, फायर वॉचर करण आर्य, प्रांतरक्षक जवान पूरण सिंह आणि रोजंदारी मजूर दिवाण राम यांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली नुकसानभरपाई
वन अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलातील आगीत गंभीररीत्या भाजलेल्या कर्मचा-यांमध्ये अग्निनिरीक्षक कृष्ण कुमार, प्रांतीय रक्षक शिपाई कुंदन सिंह नेगी, रोजंदारी कामगार कैलाश भट्ट आणि वाहनचालक भागवत सिंह भोज यांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, जखमींवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत. यासोबतच मृत झालेल्या कर्मचा-याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.