खांडवा : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील कुंदावत गावात गुरूवार दि. ३ एप्रिल रोजी विहिरीतील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या ८ जणांचा गाळात अडकून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खंडवा एसपी, जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. नवरात्रीनिमित्त गावक-यांनी गावात गणगौर मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती. नवरात्रीनंतर गणगौर मातेच्या मूर्तीचे विसर्जन करायचे होते. त्यामुळे आज विहिरीची स्वच्छता करण्याचा विचार ग्रामस्थांनी केला. विहीर स्वच्छ करण्यासाठी काहीजण उतरले होते. पहिले ३ जण गाळात बुडाले, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य ५ जणांचाही बुडून मृत्यू झाला.
हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी तत्काळ स्थानिक पोलिस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच छायगावमाखान पोलिस ठाण्यासह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता, एसपी मनोज कुमार राय, एसडीएम बजरंग बहादूर सिंहही घटनास्थळी पोहोचले. पोलिस-प्रशासनाच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. विहिरीत दलदल आणि कच-यामुळे तयार झालेल्या विषारी वायूमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्येक ४ लाखांची आर्थिक मदत जाहीर
या अपघातात राकेश (२१), वासुदेव (४०), अर्जुन (३५), गजानन (३५), मोहन(माजी सरपंच, ४८), अजय (२५), शरण (३७) आणि अनिल (२५) यांचा मृत्यू झाला. खंडवाचे जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आणि सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली.