सेलू : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने व न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संयोजकासह ८ जनावर गुन्हे दाखल केले आहेत.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी करिता शासनाने व न्यायालयाने लेझर व डीजेच्या वापरावर बंदी घातलेली असताना तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी डीजे लावण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही गणपती विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळाच्या पदाधिका-यांचे स्वागत करण्याकरिता आजी-माजी आमदार तसेच विविध पक्षाच्या पदाधिका-यांनी स्वागत कक्ष उभारले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदी घातलेल्या लेझर व डीजेचा वापर करण्यात आला.
येथील क्रांती चौक परिसरात पोलिसांची मोठी कुमक देखील उपस्थित होती. मात्र सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत लेझर व डीजेचा वापर सुरूच होता. त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मात्र जिंतूर येथील गणपती मिरवणुकीच्या प्रसंगी डीजेच्या आवाजाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला ही बातमी सेलूत येऊन धडकताच रात्री ११ वाजता पोलिसांनी डीजे वाजवण्यावर बंदी घातली. दरम्यान गणपती विसर्जनास आज ८ दिवस झाल्यानंतर सेलू पोलिसांनी संयोजक राजेंद्र पवार, अशोक अंभोरे व विनोद तरटे यांच्यासह ५ डीजे चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा प्रकार
गणपती विसर्जनात लेझर व डीजेच्या वापरास स्पष्टपणे बंदी असतानाही हौशी नेते मंडळींनी शासनाची व न्यायालयाची भूमिका न मानता त्यांचे आदेश धुडकवून सर्रासपणे लेझर व डीजेचा मोठ्या प्रमाणात वापर केला. सर्वसाधारण नागरिक व कार्यकर्ते देखील त्यांचेच अनुकरण करतात. म्हणून जे नेते व पदाधिकारी अशा गोष्टीला प्रोत्साहन देतात त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावयास पाहिजे होते. तसे न करता त्यांना सोडून त्यांच्या कार्यकर्त्यावर व डीजे चालकावरच गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशीच चर्चा सेलू आणि परिसरात मोठ्या चवीने होत असल्याचे दिसत आहे.