बीड : प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. यामुळे धरण, प्रकल्पातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान बीड जिल्हावासीयांसाठी देखील आनंदाची बातमी असून जिल्ह्यातील १४३ पैकी ८० प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पात मिळून ५८ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
राज्यात मागील दीड- दोन महिन्यांपासून पाऊस सुरु आहे. मागील आठवड्यात म्हणजे १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे तर बीड जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती पूर्णत: बदलून गेली आहे. जिल्ह्यातील १४३ लहान- मोठ्या धरणात एकूण ५८ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. गणपती आगमनाच्या दिवशी बीड शहरासह अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे लहान- मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याची सुखद वार्ता आहे. अद्यापही अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. हळूहळू सर्वच प्रकल्प भरतील; अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दोन दिवसांच्या पावसाने पाण्याची अधिक आवक
दरम्यान जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात फारसा चांगला पाऊस झाला नाही. मात्र १ ते २ सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सलग २४ तास संततधार सुरु होती. यामुळे बिंदुसरा प्रकल्प ओसंडून भरून वाहू लागला आहे. ंिबदुसराचे पाणी नद्यांच्या मार्गे माजलगाव धरणास जाऊन मिळाले. तसेच माजलगाव परिसरात सुद्धा थोडाफार पाऊस याच कालावधीत झाला होता. त्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी ३५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.