29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रपहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघांत ८५ उमेदवार

पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघांत ८५ उमेदवार

नागपूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान होणार आहे. या ५ जागांवर आता उमेदवार निश्चित झाले असून लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २६ उमेदवार तर त्या खालोखाल चंद्रपूरमध्ये १५ उमेदवार रिंगणात असून ५ मतदारसंघांत एकूण ८५ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.विदर्भातील बहुतांश जागांवर काँग्रेसविरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीने दिलेल्या उमेदवारांमुळे निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. ११ अपक्षसुद्धा रिंगणात आहेत. त्यामुळे हे अपक्ष आता कोणासाठी डोकेदुखी ठरणार, याचे उत्तर ४ जून रोजी मिळणार आहे. त्या खालोखाल चंद्रपूरची लढत सुद्धा लक्षवेधी होण्याची चिन्हे असून १५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ही एकमेव जागा काँग्रेसने २०१९ मध्ये जिंकली होती. त्यामुळे या जागेवर काँग्रेसला पुन्हा एकदा विजयाची आशा आहे.

गडचिरोलीतही भाजपविरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होत आहे. भाजपचे अशोक नेतेविरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसन रिंगणात आहेत. या मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात असून सर्व पुरुष उमेदवार आहेत. गडचिरोलीत ३ अपक्ष रिंगणात आहेत. भंडाराच्या जागेवर काँग्रेसचे प्रशांत पडोलेविरुद्ध भाजपचे सुनील मेंढे आहेत. याठिकाणीही अपक्ष सर्वाधिक असल्याने हे अपक्ष कोणाची मते खातात, याकडे लक्ष असेल. भंडारामध्ये ११ उमेदवार अपक्ष आहेत.

रामटेकची लढतही लक्षवेधी असणार आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली. शिंदे गटातील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कट करून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे निर्णय रिंगणात आहेत.

रामटेकमध्ये बसला धक्का
रामटेकच्या रिंगणात अपक्ष उमेदवार कोणीही नाही. या मतदारसंघातून काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने उमेदवारी बाद झाली. त्यामुळे काँग्रेसची अडचण झाली होती परंतु तेथे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान
पहिल्या टप्प्यात राज्यातील विशेषत: पूर्व विदर्भातील ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या ५ मतदारसंघांमध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे. एकूण ५ मतदारसंघात ८५ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघांत उमेदवारांची संख्या बरीच असली तरी थेट लढत कॉंग्रेस आणि भाजपमध्येच आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR