37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यावीज दरवाढीचा शॉक

वीज दरवाढीचा शॉक

महागाईचा भडका, प्रतियुनिट साडेसात टक्के वाढ

पुणे : प्रतिनिधी
राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला. मात्र, दुसरीकडे महावितरणने वीजदरवाढीचा ग्राहकांना झटका दिला. १ एप्रिलपासून वीजबिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

गतवर्षी महावितरणने सादर केलेली वीजदरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली. त्यानुसार वीजदरात सरासरी २१.६५ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा वीजग्राहकांच्या संघटनांनी केला होता. त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) वीजबिलात सरासरी ७.२५ टक्के, तर या आर्थिक वर्षात (२०२४-२५) वीजबिलात ७.५० टक्के अशी एकूण सरासरी १४.७५ टक्के वाढ झाली आहे. स्थिर आकारातही गेल्या वर्षी १० आणि या वर्षी १० टक्के अशी २० टक्के वाढ झाली आहे. घरगुतीसह व्यापारी, शेतकरी, उद्योग अशा सर्वच वर्गवारींतील ग्राहकांना ही दरवाढ लागू होणार आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा काळातच वीजदर वाढीचा ‘शॉक’ ग्राहकांना बसणार आहे.

इतर राज्यांत कमी दर
देशातील अन्य राज्यांत विजेचे दर आपल्यापेक्षा खूप कमी आहेत. अनेक राज्यांत शंभर युनिटपर्यंत वीजबिल माफ केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दर कमी करणे सोडाच. परंतु नियमित दरवाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शॉक बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR