मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थितीची टांगती तलवार असताना बालकांचे कुपोषण आणि त्यामुळे होणा-या बालमृत्यूच्या समस्येसंदर्भात अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या वर्षातील ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात ८५२ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामध्ये ६५९ अर्भकमृत्यू आहेत. तर, एक ते पाच वर्षे वयोगटातील १९३ बालमृत्यूंचा यात समावेश आहे.
अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना पोषणसेवा देण्यात येत असली, तरी ती पुरेशी नाही. कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढणे महत्त्वाचे असले, तरी कुपोषण होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक पातळीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. भविष्यातील दुष्काळी संकटाचा बालकांवर विपरीत परिणाम होऊन, कुपोषित बालकांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे प्रतिबंधात्मक पातळीवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे याकडे राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी बालमृत्यूंच्या संदर्भात काम करणा-या तज्ज्ञांसह आरोग्य कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.