मुंबई : देशभरात कोविडबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या जेएन१ मुळे कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रात आज ८७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
तर, जेएन१ व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिका विभागात सर्वाधिक १९ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज १४ कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, ८७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. हे रुग्ण पुणे आणि सांगली येथील असल्याची माहिती आहे. राज्यात कोरोना मृत्यू दर हा १.८१ टक्के इतका आहे.