36.8 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रआरोपी दत्ता गाडेविरोधात ८९३ पानी दोषारोपपत्र दाखल

आरोपी दत्ता गाडेविरोधात ८९३ पानी दोषारोपपत्र दाखल

पुणे : राज्यभरात खळबळ माजवणा-या स्वारगेट एस.टी. स्थानक बलात्कार प्रकरणात लेटेस्ट अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात ८९३ पानांचे दोषारोपपत्र शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात दाखल केले आहे. ५२ दिवसांत खंडणीविरोधी पथकाने हा तपास पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल केले आहे.

हा धक्कादायक प्रकार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडला होता. परगावी जाण्यासाठी स्वारगेट एस.टी. स्थानकात आलेल्या एका तरुणीकडे आरोपी दत्ता गाडे याने स्वत:ला वाहक असल्याची बतावणी केली. त्यानंतर तरुणीला एका शिवशाही बसमध्ये नेऊन, दरवाजा बंद करून तिला जीवे मारण्याची धमकी देत दोनदा बलात्कार केला. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीला अटक केली. मात्र, अद्याप आरोपीचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागलेला नाही, अशी माहिती तपासातील अधिका-यांनी दिली आहे.

तर आज दोषारोपपत्रात घटनेचा तपशीलवार आढावा, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे समाविष्ट करण्यात आले आहेत. पुढील सुनावणीसाठी आता न्यायालयाकडून तारखेची प्रतीक्षा आहे. या संपूर्ण प्रकरणाने प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून एस.टी. स्थानकांतील देखरेख व सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR