31.3 C
Latur
Sunday, June 16, 2024
Homeमहाराष्ट्रबॉयलर स्फोटात ९ जणांचा होरपळून मृत्यू

बॉयलर स्फोटात ९ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मध्ये गुरूवार दि. २३ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास झालेल्या बॉयलरच्या भीषण स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाला असून ४८ जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान हा स्फोट बॉयलरचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

डोंबिवली एमआयडीसी फेज-२ येथील एका कंपनीत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण स्फोट झाला आणि या स्फोटाच्या आवाजाने जवळपास संपूर्ण शहर हादरले. या स्फोटात कंपनी बेचिराख झाली असून किमान ४८ जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर डोंबिवली आणि लगतच्या भागातील अग्मिशन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर, माहिती मिळताच उद्योगमंत्री उदय सामंत हेही घटनास्थळी पोहोचले होते.

डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. मात्र, येथील भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अडथळा येत होता. आगीची तीव्रता भीषण व धुराचे लोळ परिसरात पसरत असल्याने अग्निशमनच्या जवानांना आग विझवताना कसरत करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर : मुख्यमंत्री शिंदे
डोंबिवली एमआयडीसी विभागातील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली असून दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत यावेळी जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या दुर्घटनेला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

अधिका-यांशी चर्चा : फडणवीस
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. ९ जण या घटनेत अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच, संबंधित अधिका-यांशी चर्चा झाल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.

उपचाराचा खर्च सरकार करणार : सामंत
मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली एमआयडीसी येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

४ किमीपर्यंत स्फोटाचा आवाज
स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर परिसरातील दुकानांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज ३ ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे व्हीडीओ व फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत.

९ वर्षांपूर्वीच्या स्फोटाची आठवण
२६ मे २०१६ रोजी एमआयडीसी फेज २ मधील प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. या घटनेची तीव्रता अधिक असल्याने कंपनीत काम करणा-या १२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, आजुबाजूच्या परिसरात राहणा-या २१५ जणांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यावेळी, कल्याण तहसील दाराकडून २६६० नुसार बाधितांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. पंचनामे झालेल्या मालमत्तेचा आकडा साधारणपणे ७ कोटी ४३ लाख सत्तर हजार रुपयांपर्यंतचा होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR