जामनगर : भारत हा कोणाच शत्रू नाही आणि कोणी शत्रूत्व घेतले तर त्याला सोडत नाही. रशिया, फ्रान्सच्या मदतीने भारतीय सैन्यदलांनी आपली ताकद जबरदस्त वाढविली आहे. आपल्याकडे धाडसी शूरवीर आहेत, परंतू त्यांना अधिक घातक डीआरडीओसारख्या संस्थांनी केले आहे. भारतीय सैन्याची ख्याती आता अवघ्या जगभरात झालेली आहे. याच सैन्याच्या हवाई दलाने आज पाहुणचार काय असतो हे अवघ्या जगाला दाखवून दिले आहे.
याच हवाई दलाने पाकिस्तानचा ऑपरेशन सिंदूरवेळी चांगला समाचार घेतला होता. आज दक्षिण कोरियाने त्यांचा पाहुणचार अनुभवला आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात शत्रू राष्ट्र तुर्कीलाही मदत करणारे हे हवाई दल मित्र देशांसाठी मदत करणार नाही, असे होणे शक्य नव्हते. भारतीय हवाई दलाने पुन्हा एकदा आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे आणि तांत्रिक सज्जतेचे दर्शन घडवले आहे. दक्षिण कोरियाच्या हवाई दलाची ब्लॅक ईगल्स ही जगप्रसिद्ध एरोबॅटिक टीम सौदी अरेबियाला जात असताना त्यांच्या विमानांना गुजरातच्या जामनगर हवाई तळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्यांना हवी ती मदत पुरविण्यात आली.
दक्षिण कोरियाची नऊ टी-५० गोल्डन ईगल फायटर जेट्स आणि एक सी-१३० ट्रान्सपोर्ट विमान रियाधकडे निघाली होती. मात्र, या विमानांची इंधन क्षमता मर्यादित असल्याने त्यांना वाटेत तांत्रिक थांबा आणि इंधन भरण्याची गरज होती. अशा वेळी भारतीय हवाई दलाने जामनगरमध्ये या ताफ्याला लँडिंगसाठी परवानगी दिली आणि सर्व आवश्यक तांत्रिक सुविधा पुरवल्या. यापूर्वी ही टीम नागपूरमध्येही थांबली होती.
भारतीय हवाई दलाने काय केली मदत?
जामनगर तळावर या सर्व फायटर जेट्सना सुरक्षितपणे उतरवण्यात आले. लांबच्या प्रवासासाठी विमानांना आवश्यक असलेले हाय-ग्रेड इंधन पुरवण्यात आले. हवाई दलाच्या इंजिनिअर्सनी विमानांची तांत्रिक तपासणी आणि ग्राउंड हँडलिंग सेवा दिली. वैमानिक आणि क्रू मेंबर्ससाठी कस्टम आणि इमिग्रेशनची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली.

