लातूर : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून औसा-तुळजापूर-सोलापूर-कोल्हापूर, मुरुड-धाराशिव-बार्शी-पुणे-मुंबई, लातूर- कळंब, लातूर-उमरगा-कलबुर्गी या सर्व बस सेवा पूर्ववत सुरू करा अन्यथा प्रवासी संघटनेला व नागरी हक्क संघर्ष समितीला न्याय हक्कासाठी तीव्र संघर्ष करावा लागेल असा ईशारा २५ एप्रिल रोजी मध्यवर्ती बस स्थानक येथे सूर्यप्रकाश धूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागरिकांनी व्यक्त केला.
नागरी हक्क संघर्ष समिती आणि एसटी प्रवासी संघटना यांनी विभागीय नियंत्रक परिवहन महामंडळ यांना २१ एप्रिल रोजी निवेदन देऊन मध्यवर्ती बस स्थानकातून पूर्ववत बस वाहतूक सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने घेतला आहे असे सांगून असमर्थता दर्शविली त्यानंतर पोलीस अधीक्षक यांना शिष्टमंडळाने भेट दिली असता त्यांनी लवकरच सुरक्षा समितीची बैठक बोलून उचित निर्णय घेऊ असे सांगितले होते. परिवहन महामंडळाने त्यांच्या निर्णयात कसलीही सुधारणा केली नाही तसेच प्रवासी संघटनेला कल्पना दिली नाही म्हणून मध्यवर्ती बस स्थानकावर बोलवण्यात आलेल्या बैठकीस अनेक प्रवासी, सामाजिक संघटना आणि नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी अॅड. उदय गवारे यांनी प्रशासनाचा निर्णय हा एसटी प्रवाशावर अन्यायकारक असून खाजगी प्रवासी वाहतूक आणि अवैध प्रवासी वाहतूक यांना यामुळे आर्थिक फायदा होणार आहे. तसेच एस . टी महामंडळ तोटयात जाणार आहे. एवढेच नाही तर एसटी प्रवासी हा प्रामुख्याने शहराच्या पूर्व भागात राहतो तसेच मध्यवर्ती बस स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.
प्रशासनाने पूर्ववत बस सेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी केली. यावेळी अशोक गोविंदपुरकर यांनी मध्यवर्ती बस स्थानक हे सर्वांच्या सोयीचे ठिकाण आहे, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना नवीन निर्णयामुळे अनेक अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल करावा अन्यथा हा विषय पालकमंत्री यांच्यासमोर मांडण्यात येईल तसेच प्रशासनाने दिरंगाई केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे सांगून प्रशासनाने २ मे पर्यंत बस सेवा पूर्ववत सुरू नाहि केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी विश्वभर भोसले, बसवंत भरडे, नागनाथ साळुंखे, सिद्धार्थ सूर्यवंशी, बाबासाहेब सीतापुरे, डी. उमाकांत, सतीश करंडे, प्रा. माधव गंगापुरे, सुरज सुरवसे, किशोर कुलकर्णी, यांनी प्रशासनाच्या निर्णयावर टीका करून मध्यवर्ती बस स्थानकातून पूर्ववत बस सेवा सुरू करावी असे विचार मांडले. या बैठकीस प्रामुख्याने सूर्यप्रकाश धूत, अशोक गोविंदपुरकर, अॅड. उदय गवारे, बसवंत भरडे, विश्वभर भोसले, दीपक गंगणे, सिद्धार्थ सूर्यवंशी, सुरज सुरवसे, नागनाथ साळुंखे, रईस टाके, अॅड. जैनु शेख, अॅड. हरिदास निटुरे, प्रा. माधव गंगापुरे, संजय जमदाडे, प्रकाश वाघमारे, तेजस चिकटे, किसन सूर्यवंशी, राजकुमार मरे, बाबासाहेब सीतापुरे, बालाजी रणक्षेत्रे, डी. उमाकांत, अवीराजे निंबाळकर, नागनाथ साळुंखे उत्कर्ष होळीकर, खय्युम तांबोळी, संतोष खंडेलवाल, इरफान तांबोळी, प्रकाश वाघमारे ओमकार सूर्यवंशी, महबूब सौदागर, सतीश कारंडे, राजू चव्हाण, माणिक निलंगेकर, वलिसाब तांबोळी, संतराम शंके, शंकर सूर्यवंशी, विजय जाधव, शेख खुद्दुस, यांच्यासह अनेक प्रवासी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.