दापोली : नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे. तसेच मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला चांगले समजते, असा दम कदम यांनी राणेंना दिला आहे.
योगेश कदम म्हणाले, मी जन्मापासून शिवसेनेत आहे, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचे बाळकडू पाजले आहे. मी कधीही भगवा खाली ठेवला नाही, याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावे, असा टोला देखील योगेश कदम यांनी राणेंना लगावला. आमच्या हातात आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही राहिल. एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नये.
पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगल माहित आहे. त्यांनी कुठे सभा घ्यावी? काय घ्यावी? हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे. पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मी गृहविभागाच्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करतो. आम्ही गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी काम करतो.
काय म्हणाले होते नितेश राणे?
दापोली येथील सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले होते, इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. गृहखाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. एफआयआरमध्ये जर नाव आले नसेल, वाचवणारे कोणी असेल ते आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत. संबंधीत खात्यातील काही लोकांनी लक्षात घ्यावे, अशी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती.