34.4 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeमहाराष्ट्रदहशतवाद्यांना जात-धर्म नसतो

दहशतवाद्यांना जात-धर्म नसतो

वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्यातील धर्मांचा दावा नाकारला

मुंबई : पहलगाम हल्ल्याबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाद निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे आहे की, कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता आहे? असे विचारतील. काही जण दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केल्याचा दावा नाकारत आहे.

दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. या प्रकरणात दोषी असणा-या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करावी. या प्रकारास इतर कोणताही रंग देऊ नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पहलगाम हल्लाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? २०० किलोमीटरपर्यंत दहशतवादी कसे आले? तुमच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? सुरक्षेत चूक कशी झाली? यावर विचार केला पाहिजे. या प्रकरणात दुसरीकडे लक्ष घेऊन जाणे चुकीचे आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

राज्य सरकार गोंधळात
विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या वादावर बोट ठेवत सांगितले की, अलीकडे गोंधळी सरकार आहे. एक मंत्री दुस-या मंत्र्यांच्या मतदारसंघात जातो आणि हिंदूत्त्व सांगतो. त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम म्हणतात, की कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. दोघेही मंत्री आहेत. दोघेही जबाबदार आहेत. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, पाकिस्तानचा एकही नागरीक महाराष्ट्रात नाही. दुसरीकडे नगरविकास खात्याचे मंत्री म्हणतात, १०७ पाकिस्तानी सापडत नाही. इतका समन्वयाचा अभाव दिसत आहे. यावरुन हे सरकार किती गोंधळलेले हे दिसत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

इतिहास संपविणे धर्मांधतेला खतपाणी
एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढला. त्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, जुना इतिहास पुसून नवीन इतिहास तयार करण्याची ताकद दाखवा. इतिहासांत जे काही घडले. ते आपण जपतो. पुढच्या पिढीला काही शिकवता येईल. इतिहास संपवणे धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखे आहे. भेदभाव निर्माण करण्याची भूमिका आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR