कराची : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान भारतासोबत युद्धाची तयारी करत आहे. अरब देश, चीन आणि ब्रिटनकडे पाकिस्तान अब्जावधी रुपयांची मागणी करत आहे. अशातच पाकिस्तानने तुर्कीकडून अद्ययावत शस्त्रास्त्रे मिळविण्यात यश मिळविले आहे. या देशांनी जर पाकिस्तानला पैसा दिला तर तो देखील पाकिस्तान शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठीच वापरणार आहे. पाकिस्तानी नेते भारतासोबत युद्धाची भाषा करत आहेत. परंतू, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान असलेला भाऊ शाहबाज शरीफ यांना भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे, असा सल्ला दिला आहे.
भारताविरोधात युद्धाच्या दिशेने पाऊले टाकू नका, त्या ऐवजी कुटनितीने तनाव कमी करण्यावर भर द्यावा, असा सल्ला नवाझ शरीफ यांनी दिला आहे. पाकिस्तानी नेते एकीकडे भारतासोबत युद्ध करण्याची, मंत्री अणुबॉम्ब वापरण्याची धमकी देत आहेत. परंतू शाहबाज शरीफ कात्रीत सापडले आहेत.
भारताने केलेली कारवाई, पाकिस्तानने त्यावरून केलेली कारवाई तसेच पाकिस्तानच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी नवाझ शरीफ यांना दिली आहे. भारताशी युद्धात अडकण्यापेक्षा राजनैतिक स्तरावर प्रयत्न करा. भारतासोबतचे युद्ध पाकिस्तानसाठी चांगले ठरणार नाही, असे शरीफ यांनी सांगितल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
मरियम नवाझ देखील तिथे उपस्थित होत्या. यावेळी शाहबाज यांनी पाकिस्तान भारताला जशास तसे प्रत्युतर देण्यास तयार असल्याचे नवाझ शरीफ यांना सांगितले. भारताने हल्ला केल्यास त्याला अधिक ताकदीने उत्तर देणार, तसा प्रस्ताव शाहबाज यांनी नेला होता. यावर नवाझ शरीफ यांनी हा सल्ला दिला आहे.