अकोला : राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पहिल्यांदा न्यायालयात भूमिका मांडणे गरजेचे आहे, कुठल्याही निवडणूक थांबवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, यात दुर्दैव असे आहे की, निवडणूक आयोगाला कणा नाही, ते निवडणूक घेण्यासाठी आहे. संविधानाने सरळ सांगितलेले आहे की, सर्वोच्च न्यायालयाला अधिकार नाही, त्यांनी हिम्मत दाखवून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला पाहिजे असे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्थानिकच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात अडकून पडल्याने निवडणुका होत नसल्याचे सांगितले जात आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे.
पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारकडून देण्यात येत असलेल्या प्रत्युत्तरावर प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडली. आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेइज्जत करण्यात आले आहे, सरकारने तिथं कसल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसत नाही, थातूरमातूर कारवाई केलेली आहे. व्हिसा घेऊन आलेल्यांना परत पाठवणे ही कारवाई होत नाही. ते परत जाणारच होते, त्यात काही नावीन्य नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
मुंबईत एकत्र जमणार
एकंदरीत असे दिसते आहे की मिलिटरी अॅक्शन घ्यायला तयार आहे, पण राजकीय नेतृत्व जे आहे, ते निर्णय घ्यायला तयार नाही. सरकारने निर्णायक निर्णय घ्यावा म्हणून, मुंबईतील हुतात्मा स्मारकासमोर दोन मे रोजी तीन वाजता एकत्रित जमणार आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
तुम्ही अॅक्शन घ्या
मुंबई असणा-या लोकांनी, ज्यांना ज्यांना वाटते सरकारने कारवाई करायला पाहिजे, तिथे सर्वांनी उपस्थित रहावे. एका आवजात आम्ही तुमच्या सोबत आहोत, तिजोरीत पैसे नसतील तर सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही अॅक्शन घ्या. कच खाऊ नका, हे सांगण्यासाठी दोन तारखेला एकत्र जमणार आहोत आणि सरकारला भाग पाडणार आहोत, असे आम्ही एकत्र येणार आहोत असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.