नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानने पोसलेला दहशतवाद भारत सहन करत आहे. कित्येक हल्ले झाले आहेत, कित्येक जवान शहीद झाले आहेत. या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच नाही तर भारतभरात हल्ले केले आहेत. पाकिस्तान कंगाल झाला आहेच, परंतू यामुळे भारतालाही बलिदानासोबत प्रचंड पैसाही खर्च करावा लागला आहे. हाच पैसा जर विकासावर खर्च करता आला असता तर आज भारत अमेरिकेच्याही पुढे गेला असता.
गेल्या ३२ वर्षांत भारताने किती दहशतवादी मारले आणि यासाठी किती जवान धारातीर्थी पडले याची आकडेवारी समोर आली आहे. पाकिस्तानने जवळपास २३,३८६ हून अधिक दहशतवादी निर्माण केले, कारण भारताने २३,३८६ एवढे दहशतवादी मारले आहेत.
एवढ्या प्रचंड प्रमाणावर दहशतवाद्यांचे निर्माण करूनही पाकिस्तान थकलेला नाही. कित्येक घरातील तरुण रक्त पाकिस्तानने संपविले आहे. इंस्टीट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंटने यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या अहवालानुसार नऊ राज्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी संवेदनशील आहेत.
१९८८ पासून २०१९ पर्यंत देशात तब्बल ५६ हजार दहशतवादी हल्ले झाले आहेत. या काळात भारतीय सैन्याने, पोलिसांनी २३,३८६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या काळातील दहशतवादी हल्ल्यात थोडे थोडके नव्हे तर १४,९३० सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दहशतवाद्यांचे हल्ले परतवून लावताना ६,४१३ जवान शहीद झाले आहेत.
पाकिस्तानने गेल्या १६ वर्षांत ९०१४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये ५९ भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर सैन्याचे ५७ जवान व निमलष्करी दलाचे ४२ जवान शहीद झाले आहेत.