मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार नेरुळ ड्रग्ज प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. प्रस्तुत प्रकरणात प्रत्यक्षात ११०० ते १२०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला. पण प्रत्यक्षात ते कमी दाखवण्यात आलेत, असे ते म्हणालेत. दरम्यान सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.
महाराष्ट्र पोलिसांसारखा अकार्यक्षम विभाग जगात कुठेही नाही. या पोलिसांनी ५० लाख रुपये पकडले तरी, ते फक्त ५० हजार दाखवतात, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत त्यांना असे न बोलण्याची ताकीद दिली होती. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी गायकवाड यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
रोहित पवार म्हणाले की, आमदार संजय गायकवाड जे बोलले ते खोटे आहे असे अजिबात नाही. ५० लाखांचा माल सापडला तरी पोलिस प्रत्यक्षात तो कमी दाखवतात व वरचे पैसे लाटतात असे ते म्हणाले. त्यांना माहिती असल्याशिवाय ते असे बोलणार नाहीत. माझी मागणी आहे की, गायकवाड यांनी ज्या पोलिसांवर आरोप केले, ते पोलिस शोधून काढावेत. नेरुळ ड्रग्ज प्रकरणात एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणी १०० ते १२०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला. पण प्रत्यक्षात रक्कम वेगळी दाखवली गेली. त्यामुळे या प्रकरणात पोलिस खात्यातील अधिका-यांचा समावेश असल्याचा संशय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे.
लाडक्या बहिणींचा केवळ मतांसाठी वापर
रोहित पवार यांनी यावेळी महायुती सरकारवर महिलांचा केवळ मतांसाठी वापर केल्याचाही आरोप केला. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने निवडून आल्यानंतर महिलांना दरमहा २१०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे आश्वासन दिले. आत्ता लाडक्या बहिणी या पैशांच्या प्रतिक्षेत असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महायुतीने २१०० रुपये देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचा दावा केला. यामुळे महायुतीने लाडक्या बहिणींचा केवळ मतांसाठी वापर होत असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.
संजय गायकवाड विधानावर ठाम
दुसरीकडे, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या पैसे खाण्यासंबंधीच्या आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मी माझ्या विधानाप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. पण मी केलेले विधान हे माअझ्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित होते. मी त्यावर अजूनही ठाम आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून माझ्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केल्याचे ते म्हणाले असे गायकवाड म्हणाले.