यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. लेक यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं कळताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना घडली . यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या वागद ( इजारा) येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
प्रल्हाद खंदारे असे मृत्यमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे .यूपीएससीच्या निकालानंतर मोहिनी प्रल्हाद खंदारेच्या वडिलांच्या निधनाने संपूर्ण खंदारे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगली रँक मिळवत मोहिनी खंदारे या तरुणीनं कुटुंबीयांची मान उंचावली खरी मात्र आपल्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या वडिलांवर काळाने घाला घातल्याने मोठे यश आयुष्यभराचं दुःख देऊन जाणारं ठरले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात मोहिनी प्रल्हाद खंदारे हिला ८८४ रँक मिळाला. मुलगी प्रशासकीय अधिकारी होणार या बातमीने सुखावलेल्या वडिलांनी गावकऱ्यांना पेढे वाटायला सुरुवात केली. ग्रामस्थांना पेढे वाटतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे मुलीचा आनंदाचा दिवस दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूने क्षणार्धात कुटुंब पोरके झाले. प्रल्हाद खंदारे असे मोहिनीच्या वडिलांचे नाव आहे. पुसद पंचायत समिती बुलढाणा येथे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते . त्यांच्या मृत्यूने सारा गाव हळहळलाय.