25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रकांदा पुन्हा रडविणार!

कांदा पुन्हा रडविणार!

पावसाळ्यापर्यंत दर चढेच, अवकाळीने मोठे नुकसान

नवी मुंबई : लहरी हवामानाचा फटका बसल्याने गेल्या वर्षभरात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांद्याचे पीक शेतातच आडवे झाले. परिणामी कांद्याची टंचाई कायम राहणार असून जून, जुलै या महिन्यांत चांगला कांदा येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बाजारात कांद्याचे दर चढेच राहणार आहेत, असा अंदाज व्यापा-यांनी वर्तविला.

वर्षभरात लहरी हवामान, अवकाळी पाऊस यामुळे कृषिमालाचे मोठे नुकसान झाले आहे. डाळी, कडधान्ये, दैनंदिन वापरासाठी लागणारा भाजीपाला, याच्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यातच कांदा पिकाला मोठा फटका बसला. मागच्या वर्षभरापासून कांद्याची आवक कमी होत आहे. कांद्याची टंचाई पूर्ण करण्यासाठी परदेशातील कांद्याची आयात काही व्यपा-यांनी केली होती. मात्र या कांद्याला आपल्या कांद्याची सर नसल्याने, तो भारतीयांच्या पसंतीस उतरला नाही.

मुंबईच्या घाऊक बाजारात येणा-या एकूण कांद्यापैकी फक्त २० टक्के कांदा उत्तम दर्जाचा आहे. ८० टक्के कांदा दुय्यम दर्जाचा आहे. मोठ्या प्रमाणात येणारा कांदा हा पाण्याने भिजलेला, ओलसर आहे. त्यामुळे तो जास्त काळ टिकणारा नाही. शेतकरी भिजलेला कांदा वाळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर ते शेतात नव्याने कांदा लावणार आणि तो कांदा बाजारात येण्यास पावसाळा उजाडणार, असे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे तोपर्यंत बाजारात कांद्याची टंचाई भासणार आहे. कांदा दरातही तेजी कायम राहणार आहे, असा अंदाज व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवला आहे.

कांदा निर्यातबंदी

कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा बंद पुकारण्यात आला. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात होणार आहे. किरकोळ बाजारात आवक नसल्यामुळे कांदा महागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख १५ बाजार समिती आणि दोन खाजगी अशा एकूण १७ बाजार समितींमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. परंतु लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूरमध्ये कांदा लिलाव सुरू होते.

शेतकरी आक्रमक, अनेक ठिकाणी आंदोलने
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. पाच राज्यांमध्ये नव्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक व कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी केला आहे.

दिल्लीत होणार बैठक
कांदा प्रश्नावर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे आता दिल्लीत होणा-या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR