टोरॅँटो : वृत्तसंस्था
कॅनडामधील सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने हरलेली बाजी जिंकली आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सरकार बनविण्यात यश मिळविले आहे. जानेवारीत ट्रुडो यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. यानंतर मार्क कार्नी यांच्या खांद्यावर गमावलेली प्रतिष्ठा परत मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या मदतीला ट्रम्प धावून आले आणि कार्नी यांनी कॅनडा सर केला.
या निवडणुकीचा निकाल भारताच्या दृष्टीने खास असाच लागला आहे. खलिस्तानी समर्थक जगमीत सिंग याच्या पक्षाचा धुव्वा उडाला आहे. त्याच्या पक्षाला मान्यता टिकवून ठेवण्यासाठी १२ जागा मिळू शकलेल्या नाहीत. यामुळे न्यू डेमोक्रॅटीक पार्टीचा दर्जा गेला आहे. जगमीत सिंग देखील स्वत: निवडून येऊ शकलेला नाही.
जगमीत सिंग याने या पराभवामुळे हताश होऊन आपण पद सोडणार असल्याची घोषणा केली. जगमीत सिंग २०१९ पासून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बर्नाबी सेंट्रलचे प्रतिनिधित्व करत होता. या निवडणुकीत तो तिस-या क्रमांकावर फेकला गेला आहे. जगमीत सिंग हा खलिस्तानचा कट्टर समर्थक असून त्याने अनेकदा कॅनडातील खलिस्तानी कार्यकर्त्यांच्या वतीने आवाज उठवला आहे. आता कॅनडाच्या संसदेत खलिस्तानींना कोणी वाली राहिलेला नाही.