मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जनता’ वृत्तपत्राच्या ७, ८ आणि ९ या तीन खंडांसह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड ७, ८, ९ ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य योगीराज बागुल, ज. वि. पवार, डॉ. संभाजी बिरांजे आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
‘जनता’ हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९३० ते १९५६ पर्यंत प्रकाशित झाले होते. ‘जनता’ हे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्तऐवज आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने ‘जनता’चे ६ खंड प्रकाशित केले आहेत.
‘जनता’ खंड ७ – या खंडात १२ फेब्रुवारी १९३८ ते २८ जानेवारी १९३९ पर्यंतच्या एकूण ४८ अंकांचा समावेश आहे.
‘जनता’ खंड ८ – या खंडात ४ फेब्रुवारी १९३९ ते २७ जानेवारी १९४० पर्यंतच्या एकूण ४८ अंकांचा समावेश आहे.
‘जनता’ खंड ९ – या खंडात ३ फेब्रुवारी १९४० ते १ फेब्रुवारी १९४१पर्यंतच्या एकूण ४८ अंकांचा समावेश आहे.