नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कुुंभमेळा कामांचा आढावा घेतला. कुंभमेळ्यासाठी निधीची कमी पडणार नाही. निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून याचा आराखडा अंतिम झाल्यानंतर त्याबाबत केंद्राशी चर्चा करू असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुंभमेळ्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्याबरोबरच मंजूर कामांच्या निविदा प्रक्रिया महिनाअखेर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीनंतर बोलताना महाजन म्हणाले, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित कामांचा आज सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. त्या कामांबाबत मी आजच्या बैठकीत आढावा घेतला. कुंभमेळ्यात शहरातून रिंगरोड तयार करण्यात येणार आहे. नुकताच प्रयागराज येथे कुंभमेळा झाला. करोडोच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये आल्याचे आपण पाहिले.
नाशिकमध्ये देखील यंदा दुप्पट, तिप्पट गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. याकरिता रस्त्यांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी एमएमआरडीच्या माध्यमातून शहरातून रिंगरोड तयार करण्यात येणार आहे. यामुळे नाशिक शहराची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
११ नवीन पूल, एसटीपी प्लांटना मंजुरी
त्याचप्रमाणे शहरात ११ नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यातील दोन पुलांना महापालिकेने मंजुरी देत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. उर्वरित ९ पुलांसाठीही लवकरच मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.