नवी दिल्ली : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर शुक्रवार दि. २ मे रोजी ९ महिन्यानंतर चौकशीसाठी दिल्ली पोलिसांकडे हजर झाली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पूजा खेडकर हिने नाव बदलून १२ वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पूजा खेडकर हिने नाव बदलून १२ वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना पूजा खेडकर म्हणाली की मी तपास यंत्रणेला मदत करायला तयार आहे. दरवेळी मी सर्वोच्च न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र सादर करून सांगितले आहे की, मी पोलिस आणि न्यायालयाला पूर्ण सहकार्य करेन. तसेच क्राईम ब्रँचलाही मी मेल केला आहे. चौकशीसाठी मला फोन करा, मी चौकशीसाठी तयार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने माझा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार मी आज जबाब नोंदविण्यासाठी चौकशीला हजर झाले, असे पूजा खेडकर हिने सांगितले.
नाव बदलून परीक्षेचा आरोप फेटाळला
नाव बदलून परीक्षा दिल्याच्या आरोपावर बोलताना पूजा खेडकर म्हणाली की, हा आरोप खोटा आहे. माझे नाव पूजा खेडकरच आहे आणि याच नावाने मी परीक्षा दिली आहे. परंतु माध्यमांना आणि सरकारी अधिका-यांना चुकीची माहिती दिली गेली आहे.
माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे असे म्हणत पूजा खेडकर यांनी आईचे नाव लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पूजा खेडकर यांनी असेही म्हटले की, स्वत: मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या नावात आईचे नाव लावले आहे. मग मी माझ्या नावात आईच्या नावाचा समावेश केला तर तो गुन्हा झाला का? असा प्रश्नही पूजा खेडकर हिने उपस्थित केला.