नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वा-यांसह मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामानामुळे ४० हून अधिक फ्लाइट्स डायव्हर्ट करण्यात आली आहेत तर सुमारे १०० फ्लाइट्स लेट आहेत. भारतीय हवामान विभागाने राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन तासांत दिल्ली आणि आसपासच्या भागात ७०-८० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची आणि वादळी वा-याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस उष्णतेपासून आराम मिळेल आणि कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिल्लीत वादळासाठी जारी केलेला रेड अलर्ट वाढवला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक फ्लाइट्सच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी एक विशेष सूचना जारी केली आहे. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरील काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे, असं म्हटलं आहे.