लातूर : प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची दि. १ मे रोजी लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी भेट घेऊन लातूर जिल्हा बँक व लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित कामांबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
या भेटीदरम्यान, शासकीय व निमशासकीय कर्मचा-यांचे मासिक वेतन लातूर जिल्हा बँकेमार्फत व्हावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेत पालकमंत्री महोदयांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. यावेळी लातूर ग्रामीणमधील गावांना जोडणारे रस्ते, पूल, शाळा आणि अंगणवाडी दुरुस्ती तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणीही करण्यात आली. यासोबतच, रेणापूर बाजार समितीच्या विविध प्रश्नांवरही पालकमंत्री महोदयांसोबत सविस्तर चर्चा झाली.
मांजरा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाणी वितरणात सुसूत्रता आणण्याची गरज निदर्शनास आणून देताच, पालकमंत्री महोदयांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यांनी सर्व विषयांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. भोसले आणि देशमुख कुटुंबियांचे अनेक दशकांपासून असलेले स्नेहपूर्ण संबंधांवरही या भेटीत चर्चा झाली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संतोष देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषराव हाके, संचालक प्रकाश सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.