मुंबई : वांद्रेनंतर माझगाव कोर्टानेही माजी मंत्री धनंजय मुंडेंना दणका दिल्यानंतर त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलले आहे. त्या आता मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडेंच्या आमदारकी रद्द होण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी करुणा शर्मा-मुंडे यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वीच करुणा शर्मा-मुंडे यांनी ज्या दिवशी धनंजय मुंडेंची आमदारकी घालवेन, त्या दिवशी माझा मोठा विजय असे म्हटले होते. त्याचवेळी त्यांनी पुढच्या सहा महिन्यात धनंजय मुंडेंचीही आमदारकी जाणार हे नक्की असल्याचा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली होती. करुणा मुंडे यांनी आता न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका त्यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्या गुंडाकडून मिळणा-या धमक्याबाबत तसेच या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कुणी खरेदी करू नये यासाठी करुणा शर्मा-मुंडे यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केल्याचीही माहिती आहे.
याबाबत करुणा मुंडे यांच वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, मी करुणा मुंडे यांच्या वतीने वकीलपत्र दाखल केले आहे. त्यात दोन अर्ज दाखल केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे. त्यांनी ती कुठेही विक्री करू नये किंवा त्यात तिस-या पक्षाचा हस्तक्षेप होऊ नये अशा आशयाचा अर्ज दाखल केला. कोर्टाने या प्रकरणात धनंजय मुंडे यांना ६ जूनपर्यंत लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे.
तसेच न्यायालयाची ऑर्डर असताना धमक्या देणे सुरु असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, धमक्या देऊ नये. हिंसेच्या गोष्टी करू नये. तसेच ६० लाख रुपये अद्यापही येणे बाकी आहे. ती रक्कम वसूल होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या सर्वांबाबत ६ जूनपर्यंत म्हणणे सादर करण्यासाठी धनंजय मुंडे यांना मुदत देण्यात आली आहे.
माझगाव कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि धनंजय मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली. त्यानंतर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. समोर मंत्री असो वा कितीही ताकदवान व्यक्ती असो, आपली बाजू सत्याची असेल तर त्याचा विजय होतोच. न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व पीडित महिलांसाठी ऐतिहासिक असाच आहे अशी पहिली प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली होती.
माझगाव कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल जाहीर केला होता. हा निकाल करुणा मुंडेंंना दिलासा देणारा, तर धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारा होता. कारण धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळत माझगाव कोर्टाने वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. यातच आता करुणा शर्मा-मुंडे यांनी आमदारकी आणि प्रापर्टीबाबत याचिका दाखल केल्यानं पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.