अहिल्यानगर : पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे अवघ्या देशात संतापाची लाट उसळली असताना आता शिर्डीचे साईसमाधी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचा एक ईमेल साई संस्थानला मिळाला आहे. या ईमेलमुळे पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
गत २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात महाराष्ट्राच्या ६ जणांसह २६ पर्यटकांचा बळी गेला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात रोष पसरला आहे. विशेषत: या प्रकरणी पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. यासंबंधी केंद्र सरकारवर कमालीचा दबाव असताना आता शिर्डी स्थित साईसमाधी मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे.
मंदिर पाइपबॉम्बने उडवण्याची धमकी
यासंबंधीच्या माहितीनुसार, साई संस्थानला धमकीचा एक ईमेल मिळाला आहे. त्यात साईसमाधी मंदिर पाइपबॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मेलमध्ये आणखी काय आहे? हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी यावर भाष्य करणे टाळले आहे. पण यामुळे सुरक्षा यंत्रणांत एकच खळबळ माजली आहे. या धमकीनंतर पोलिसांनी मंदिर परिसराची तपासणी करून तेथील सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. हा खरेच धमकीचा ईमेल आहे की, कुणी खोडसाळपणा केला आहे, याचा तपास पोलिस घेत आहेत.
केंद्रीय मंत्र्याने कालच घेतले होते दर्शन
उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी शुक्रवारीच साईसमाधीचे दर्शन घेतले होते. त्यावळी त्यांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकला कसे प्रत्युत्तर दिले जाईल हे तुम्ही तुम्ही पहाच असे सूचक विधान त्यांनी केले होते. त्यानंतर काही तासांतच साई संस्थानला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यामु्ळे चिंता व्यक्त केली जात आहे. सी आर पाटील यांच्या उपस्थितीत काल राहता येथील गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात त्यांनी पहलगाम हल्ल्याचा दाखला देत सत्कारही नाकारला होता. पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जाणार नाही तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही असे ते म्हणाले होते.