कोल्हापूर : प्रतिनिधी
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असतानाच त्यात आणखी भर पडली आहे. आहारात महत्त्वाचा भाग असणा-या दुधाच्या किमतीवर अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. तीन दिवसांपूर्वीच अमूल कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली होती. आता गोकुळ दुधाच्या किमतीतही वाढ झाली आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघाने ४ मेपासून नवे दर लागू केले आहेत.
कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढत दूध दरवाढ जाहीर केली आहे. कोल्हापुरातून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणा-या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गायीच्या दुधाच्या दरात वाढ होत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
गोकुळ दुधाचे दर २ रुपयांनी महागणार आहेत. त्यानुसार गोकुळच्या फुल क्रीम (क्लासिक) दुधाची किंमत आता ७४ रुपये प्रतिलिटर, तर ५ लिटरचा पॅक ३६५ रुपयांना झाला आहे. गाय दूध (सात्विक) ५८ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. मात्र, टोण्ड आणि गोकुळ शक्ती दुधाच्या दरात बदल होणार नाही. ही वाढ पॉलिथीन पॅकिंगमधील सर्व दूध प्रकारांसाठी लागू आहे, असे संघाने स्पष्ट केले.
अमूलनंतर गोकुळच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर ताण येणार आहे. दूधउत्पादकांना या वाढीचा लाभ मिळेल, पण ग्राहकांच्या खिशावर याचा भार पडणार आहे.