33.4 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeराष्ट्रीयकाश्मिरातील हस्तकला उद्योगाचे भवितव्य संकटात!

काश्मिरातील हस्तकला उद्योगाचे भवितव्य संकटात!

श्रीनगर : वृत्तसंस्था
काश्मिरी हस्तकला त्यांच्या कलात्मक कामासाठी आणि भव्यतेसाठी जगभर ओळखली जाते. मात्र, पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरच्या या पारंपरिक व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. काश्मिरी शाली आणि गालिचे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. पहलगाम हल्ल्यापासून काश्मिरात भीतीचे सावट आहे. याचा राज्यातील हँडलूम उद्योगावर विपरित परिणाम दिसून येत असून, तब्बल एक ते दीड हजार कोटीची उलाढाल असलेल्या हस्तकला उद्योगाचे भविष्य अंधारात सापडले आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे काश्मिरात दहशत वाढली असून, उद्योग, व्यवसाय, पर्यटनावरही विपरित परिणाम झाला. त्यातच आता या दहशतवादी हल्ल्याने काश्मीरच्या हँडलूम उद्योगावर शोककळा पसरल्याचे चित्र आहे. काश्मिरी शाली, गालिचे, महिलांचे कपडे बनवणे हे उद्योग ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन-अडीच लाख लोकांच्या हातचा रोजगार गेला. पर्यटकांनीच पाठ फिरवली तर शाली, गालिचे घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत असून, व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणारे पर्यटक तिथल्या शाली आणि गालिचांकडे आपोआप आकर्षित होतात. शाली आणि गालिचे बनवण्यासाठी मोठी मेहनत आणि एकाग्रता लागते. या दोन सूत्रांवर हा व्यवसाय आजही तग धरून आहे. डिझाइनच्या शाली आणि महिलांच्या ड्रेसवर बनवले जाणारे नक्षीकाम हे हाताने केले जाते. त्यामुळे या हस्तकलेला विशेष महत्त्व आहे.

शाली आणि महिलांच्या कपड्यावरील नक्षीकामानंतर येथे गालिचे बनतात. त्यासाठीसुद्धा एकाग्रता आणि संयम लागतोच. अचूक आणि सावधगिरीने हे गालिचे बनवतात. त्यासाठी अनुभवही खूप महत्त्वाचा मानला जातो. एक गालिचा बनवायला किमान सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणूनच काश्मीरच्या या गालिचांची किंमतसुद्धा डोळे विस्फारणारी असते. त्यावरील करण्यात येणा-या आकर्षक नक्षीकामामुळे या गालिचांना देशातच नव्हे तर जगभरात मोठी मागणी आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR